वारकरी प्रथा

वारकरी संप्रदाय

वारकरी संप्रदाय आणि वारकरी पंथ हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. वारकरी लोक ज्या आचरणप्रणालीचे पालन करतात, ज्यामध्ये श्रीविठ्ठलभक्ती प्रमुख आहे त्या धर्माला भागवत धर्म म्हणतात. या भागवत धर्माचा पाया श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला आणि श्री संत तुकाराम महाराजांनी या धर्ममंदिरावर कळस चढवला म्हणूनच वारकरी पंथाचा नित्यस्मरणी महामंत्र आहे - 'ज्ञानोबा तुकाराम'. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवद्नीतेवर सर्वजनसुलभ असे प्राकृत भाषेत भाष्य लिहिले. ही ज्ञानेश्वरी हे मराठी वाड्मयातील अनुपम लेणे आहे. भागवतधर्माचा प्रमाणभूत ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. भारतातील भीष्मपर्वात असलेली गीता संस्कृतमध्ये आहे. कुरुक्षेत्रावर महाभारतीय युद्धाच्या प्रारंभी मोहग्रस्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोगाचा सदुपदेश केला. त्याच गीतेतील 18 अध्यायांवर ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीतून भाष्य लिहिले. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे अनन्यसाधारण असे स्थान आहे. ज्ञानेश्वरीनंतर भागवत धर्मांचे विवेचन करणारे अनेक ग्रंथ संतसत्पुरुषांनी रचले. त्यापैकी नाथ भागवत, रामायण, नामदेवगाथा, तुकाराम गाथा इ. प्रमुख आहेत. वारकरी पंथास ' माळकरी पंथ ' अथवा ' भागवत धर्म ' असेंहि म्हणण्याचा प्रघात आहे. शिवाय सगुणोपासना, नामस्मरण, हरिकीर्तन, गुरुकृपा, सर्वात्मभाव, आत्मसमर्पण हीं एकादश स्कंध अध्याय दोनमध्ये भागवत श्रेष्ठाचीं जीं लक्षणें सांगितलीं आहेत त्याच अंगाने वारकऱ्याची साधना बनलेली आहे. त्याच मार्गानें वारकरी आपलें इष्ट साध्य करून घेत असतो. म्हणून ह्यास ' भागवतधर्म ' असें म्हणतात. या पंथास माळकरी पंथ हे नाव वारकऱ्याचे मुख्य बाह्य चिन्ह जी तुळशीच्या मण्यांची माळ तिजवरुन पडले आहे. ज्याप्रमाणें यज्ञोपवीतावांचून ब्राह्मण होणार नाहीं त्याप्रमाणें तुळशीच्या माळेवांचून वारकरी होऊंच शकत नाही. इतकें महत्व या पंथांत तुळशीची माळ गळ्यांत धारण करणें या गोष्टीस आहे. मुद्रा लावणे, भगवी पताका धारण करणें इत्यादी वारकऱ्यांची बाह्य चिन्हे म्हणून सांगितली जातात. पण या सर्वांत पंढरपूरची नियमानें वारी करण्याइतकेंच ज्या गोष्टीला महत्व आहे ती म्हणजे गळ्यांत तुळशीची माळ धारण करणें ही होय. त्यांचे कारण असें आहे की वारकरी हा श्रीविठ्ठलाचा उपासक आहे व श्रीविठ्ठल म्हणजे भगवान् श्रीकृष्णाचें बाळरूप आहे. याप्रमाणे वारकरी हा विठ्ठलभक्त म्हणजे कृष्णभक्त असल्यानें श्रीकृष्णास म्हणजे श्रीविठ्ठलास प्रिय असणारी तुळशीची माळ यालाहि प्रिय आहे व ती तो आपल्या उपास्यदैवतावरील प्रेमाचें निदर्शक म्हणून धारण करतो. ही माळ तुळशीच्या काष्ठाच्या मण्यांची असते, तिचे १०८ मणी असतात व मध्ये मेरू असतो. वारकरी पंथात ' गळ्यांत माळ घालणे ' याला अनंन्यसाधारण असें महत्व आहे. शैव, गाणपत्य, शाक्त हेहि माळ धारण करतात. पण ती जपापूरतीच. तिचें काम झाले म्हणजें ते ती आवडेल तर गळ्यांत ठेवतात किवां वेगळी बाहेर काढून ठेवतात. पण वारकरी पंथात एकदां गळ्यांत माळ घातली म्हणजे ती केव्हाही काढता येत नाहीं. जर ती तुटली तर सांप्रदायिक वारकरी हा ती गाठून पुनः गळ्यांत घातल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही. या कारणाकरिताच वर तिला यज्ञोपवीताची उपमा दिली आहें. पण खरें सांगावयाचें तर यज्ञोपवीताचा दृष्टांन्तहि कमीच आहें. कारण यज्ञोपवीत हे संन्यास घेऊन टाकता येतें ! माळ मात्र एकदां गळ्यांत घातली कीं ती धारण करणाऱ्याबरोबरच जाते. ती धारण करणारा कोणत्याही आश्रमांत असला तरी त्याच्याबरोबर ती राहतेच. ती केव्हांच काढायची नसते. अशारीतीनें गळ्यांत तुळशीची माळ धारण करणें हें वारकऱ्यांचे जवळ जवळ व्यावर्तक बाह्यलक्षण असल्यानें या पंथास ' माळकरी पंथ ' असेंहि म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलीनी भागवत धर्म किंवा विठ्ठल संप्रदायाला साधेसोपे स्वरुप देण्याचे महान कार्य केले. त्यांनी समाजातील सर्व वर्णांच्या लोकांना भक्तीची द्वारे खुली केली, सर्व जातीच्या, भाषेच्या, वर्णांच्या लोकांना 'भागवत धर्म' सहजसुलभ केला आहे. या संप्रदायाची आचारसंहिता बनविली. म्हणूनच " ज्ञानदेवे रचला पाया। उभारिले देवालया" असे म्हणतात.

संत तुकाराम महाराजांनी अभंग-संकीर्तनातून संसारातील कर्मे करीत विठ्ठलाचे नाम घेण्याचा उपदेश केला. संत जनाबाईने कर्मपूजा करता करता ईश भजावा हे सूत्र कष्टकरी जनतेला सांगितले. कोणतेही तीर्थव्रत न करता पंढरीची वारी करावी, हा संतानी जनतेला संदेश दिला आणि भक्तभाविकांनी तो आत्मसात केला. भागवत धर्मांचे बहुसंख्य अनुयायी ग्रामीण भागात राहतात. त्यांची श्रीविठ्ठल ही एकमेव देवता आहे. वारकरी पंथ, विठ्ठल पंथ, वैष्णवधर्म किंवा भागवत धर्म या सर्वांच्या शब्दांच्या मागे ही एकच कल्पना साकार आहे. ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे गुरु व बंधु श्री निवृतिनाथ महाराज यांच्यापासून हा संप्रदाय सुरु झाला. तुकाराम एकनाथ, नामदेव, जनाबाई इ. अनेकानेक संतांनी या संप्रदायाचा प्रसार केला. या परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय मानले जातात.महाराष्ट्रातील सर्व संत स्वत:ला विष्णुभक्त किंवा वैष्णव म्हणवितात. शिव आणि विष्णु एकच प्रतिमा आहे असा अनुभव संत नरहरि सोनारांना आला. तोच अनुभव निळोबारायांनाही 'ऐक्यरुपे हरिहर । उभा कटीवर विटेवरी' या शब्दातून व्यक्त केला. समर्थ रामदासांना सावळ्या विठ्ठलाच्या ठिकाणी भगवान शंकर आणि प्रभु रामचंद्राचे दर्शन झाले. श्रीविठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग आहे, म्हणून शैव आणि वैष्णव संप्रदायाचे लोक श्रीविठ्ठलोपासना करतात. निवृत्तिनाथ, सोपानदेव, विसोबा खेचर इ. संत नाथपंथातील अनुग्रहित शैव होते. श्री. ज्ञानदेवांच्या पूर्वजांनीही नाथपंथाचा अनुग्रह घेतला होता. काही इतिहासकारांच्या मते पंढरपूर हे शैवक्षेत्र होते. जेव्हा ज्ञानदेवादि चार भावंडे पंढरीस आली तेव्हा वारकरी संप्रदायाची लोकप्रियता पाहून त्यांनी या पंथाचा स्वीकार केला असेही मानले जाते. अशा प्रकारे पंढरपूर क्षेत्र समन्वयाचे तीर्थक्षेत्र आहे, तर भागवत धर्म हे वैदिक धर्मांचे सार आहे. वेद, उपनिदे, गीता, भागवत यांची थोरवी सकल संतांनी अभंगातून गायिली आहे.