आमच्या विषयी

इतिहासातील दाखल्यानुसार पंढरपूर मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार करण्यात आला. शालिवाहन राजवटीतील एका राजाने १३ व्या शतकात या मंदिराचे बांधकाम केल्याची नोंद इतिहासात आढळते. पंढरपूर मधील प्राचीन मंदिराचा संदर्भ विठोबाशी दिला जातो, त्यामुळे ते पूर्वीचे विठोबा मंदिर असल्याचे मानले जाते. पंढरपुर मंदिराचा जुना भाग हा १२ व्या आणि १३ व्या शतकात बांधला गेला आहे, तर उर्वरित मंदिराचा भाग १७ व्या शतकात बांधले गेले आहे असे जाणकारांचे मत आहे. मंडप १८ मीटर रुंद व ३७ मीटर लांब असून बाजूस ओवर्‍या व सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायर्‍या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोली आहे. सोळा कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. आत प्रवेश करतना उजव्या हातास संत एकनाथ महाराजाचे पणजोबा संत भानुदास महाराजान्ची समाधी आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर,दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत. चांदीचे नक्षीदार पत्रे चौखांबीच्या दरवाजास लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाचेच परमभक्त पुंडलीक याची समाधी महाद्वार घाटावर आहे. त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.

About 01

देवळास समांतर पूर्वेकडे जाणार्‍या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्त व वारकर्‍यांची सोय होते व सर्व पंढरपुरात भाविकांची वर्दळ असते.

ज्या वाळवंटी सकल संताची मांदियाळी कीर्तनरंगी नाचत, नामघोषात मग्न होवून कृतार्थ झाली, त्या वाळवंटात नाचत जयघोष करावा आणि ज्या चंद्रभागेच्या पवित्र स्नानाने संतासह लाखो भाविक, भक्त पापमुक्त झाले, धन्य झाले त्या तीर्थात स्नान करण्याची, पावन होण्याची उत्कट इच्छा भक्तजनाच्या मनी निर्माण होते.

About 02

भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. ज्या भक्तराज पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी परब्रह्म परमात्मा पांडुरंग आला आणि त्याच्या प्रार्थनेनुसार त्याने दिलेल्या विटेवर युगे अठ्ठावीस भक्तांना दर्शन देऊन कृतार्थ करण्यासाठी भीमातीरी उभा राहिला आहे, त्या पुंडलिकाचे दर्शन घेतात. चंद्रभागेच्या वाळवंटात अन्य संत मंडळीची समाधी स्थाने आहेत. नदीचे पात्र विशाल, अर्धचंद्राकार व देखणे आहे. आषाढी कार्तिकीला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्‍यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. इथुन आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळुहळु पंढरीकडे जायला निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालू असते. संध्याकाळपासुन संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते.